अध्याय दुसरा
शिवपुराणाच्या श्रवणाने देवराजला शिवलोकाची प्राप्ती
मुनिश्रेष्ठ शौनक म्हणाले, महाभाग सूत तुम्ही धन्य आहात. परमार्थतत्त्वाचे ज्ञाता आहात. तुम्ही कृपा करून आम्हाला ही अद्भूत आणि दिव्य कथा ऐकवली. आम्ही ही पापनाशिनी, मनाला पवित्र करणारी आणि भगवान् शंकरांना प्रसन्न करणारी अद्भूत कथा ऐकली. भूतलावर या कथेप्रमाणे कल्याणाचे सर्वश्रेष्ठ साधन दुसरे काही नाही, ही बाब आम्ही आज आपल्या कृपेमुळे निश्चयपूर्वक जाणली. कलियुगामध्ये या कथेद्वारा कोणकोणते पापी शुद्ध होतात? हे कृपाकरून सांगा आणि या जगाला कृतार्थ करा.
सूत म्हणाले, हे मुने! जे मनुष्य पापी, दुराचारी, कपटी आणि काम-क्रोधादिंमध्ये निरंतर बुडलेले असतात, ते सुद्धा या पुराणामुळे नक्कीच शुद्ध होतात. वास्तविक पाहता ही कथा उत्तम ज्ञानयज्ञ आहे, जी सदैव सांसारिक भोग आणि मोक्ष देणारी आहे. सगळी पापे नष्ट करणारी आणि भगवान शंकरांना प्रसन्न करणारी आहे. जे अतिशय लोभी, खोटे, आपल्या माता-पित्यांचे द्वेषी, पाखण्डी आणि हिंसक वृत्तीचे आहेत, ते सुद्धा या ज्ञानयज्ञाने शुद्ध होतात. आपल्या वर्णाश्रमधर्माचे पालन न करणारे आणि ईर्ष्याग्रस्त लोकदेखील या कलीच्या काळात या ज्ञानयज्ञाने पवित्र होतात. जे लोक छळ-कपट करणारे, क्रूर स्वभावाचे आणि अत्यंत निर्दयी आहेत, कलियुगात ते सुद्धा या ज्ञानयज्ञाने शुद्ध होतात. ब्राह्मणांच्या धनावर उपजीविका करणारे आणि निरंतर व्यभिचारात आसक्त असणारे लोक सुद्धा या ज्ञानयज्ञाने या कलिकाळातही पवित्र होतात. जे मनुष्य सदैव पापकर्मांमध्ये लिप्त असतात, शठ आहे आणि अत्यंत दुष्ट विचारांचे आहे ते कलियुगामध्ये सुद्धा या ज्ञानयज्ञाने निर्मळ होतात. दुश्चरित्र, दुर्बुद्धि, उद्विग्न चित्त असणारे आणि देवतांच्या द्रव्याचा उपभोग घेणारे पापीजन सुद्धा या कलियुगातही या ज्ञानयज्ञाने पवित्र होतात. या पुराणाचे श्रवण मोठमोठ्या पापांचा नाश करतं, सांसारिक भोग आणि मोक्ष प्रदान करतं आणि भगवान शंकरांना प्रसन्न करतं. या संबंधी मुनिगण प्राचीन इतिहासाचे उदाहरण देतात, ज्याच्या श्रवणाने पापांचा पूर्णपणे नाश होतो.
पूर्वीची गोष्ट आहे – किरातनगरात एक ब्राह्मण राहत होता, तो अज्ञानी, दरिद्री, रसविक्रेता आणि वैदिकधर्मापासून पराङ्गमुख होता. तो संध्या-स्नानादि कर्मांपासून भ्रष्ट झालेला होता आणि वैश्यवृत्तिमध्ये तत्पर झाला होता. त्याचे नाव देवराज. तो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना ठगत असे. त्याने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र आणि दुसऱ्यांना सुद्धा अनेक बहाण्यांनी मारून त्यांचे धन हडपले होते. नंतर त्याने अधर्माने पुष्कळ धन अर्जित केले, परंतु त्या पापी माणसाचे थोडे देखील धन कधी धर्माच्या कामामध्ये लागले नाही.
एक दिवस तो ब्राह्मण एका तलावावर स्नानासाठी गेला. तिथे शोभावती नावाच्या एका वेश्येला बघून अत्यंत मोहित झाला. ती सुंदरी सुद्धा त्या धनी ब्राह्मणाला वशीभूत झालेला जाणून आनंदित झाली. आपसातील वार्तालापामुळे त्यांच्यामध्ये प्रीति उत्पन्न झाली. त्या ब्राह्मणाने त्या वेश्येला पत्नी करण्याचे आणि त्या वेश्येने त्याला पती करण्याचे स्वीकार केले. अश्याप्रकारे कामवश होऊन दोघेही अनेक काळ विहार करत राहिले. बसणे, झोपणे, खाणे-पिणे आणि क्रीडा यामध्ये ते दोघेही निरंतर पति-पत्नी प्रमाणे व्यवहार करू लागले. त्याच्या माता-पित्यांनी व पत्नीने सतत अडविल्यावर सुद्धा पापकर्मामध्ये संलग्न असणारा तो ब्राह्मण त्यांचे म्हणणे ऐकत नसे. एक दिवस रात्री त्या दुष्टाने ईर्ष्येने, आपल्या झोपलेल्या माता-पिता आणि पत्नीला मारले आणि त्यांचे सारे धन हरण केले. वेश्येमध्ये आसक्त चित्ताच्या त्या कामी पुरुषाने आपले आणि आपल्या पिता इत्यादिंचे सर्व धन त्या वेश्येला देऊन दिले. तो पापी अभक्ष्य-भक्षण आणि मद्यपान करू लागला आणि तो नीच ब्राह्मण त्या वेश्येसोबत एकाच ताटात सदैव उष्टे भोजन करू लागला.
एक दिवस फिरत-फिरत तो दैवयोगाने प्रतिष्ठानपुरला पोचला. तिथे त्याला एक शिवालय दिसले ज्यामध्ये अनेक साधु-महात्मे एकत्रित आले होते. देवराज त्या शिवालयामध्ये थांबला आणि तिथे त्या ब्राह्मणाला ताप आला. त्या तापामुळे त्याला खूप त्रास होऊ लागला. तिथे एक ब्राह्मणदेवता शिवपुराणकथा सांगत होते. तापाने फणफणलेला देवराज, त्या ब्राह्मणाच्या मुखारविन्दातून निघालेली शिवकथा निरन्तर ऐकत राहिला. एका महिन्यानंतर तापामुळे त्याचा मृत्यु झाला. यमराजाचे दूत आले आणि पाशांनी बांधून त्याला जबरदस्तीने यमपुरीला घेऊन गेले. तेवढ्यातच शिवलोकातून भगवान शंकराचे पार्षदगण आले. त्यांचे गौर अंग कापूराप्रमाणे उज्ज्वल होते, हात त्रिशुळाने सुशोभित होते, त्यांचे संपूर्ण अंग भस्माने उद्भासित होते आणि रुद्राक्षांच्या माळा त्यांच्या शरीराची शोभा वाढवत होते. ते सगळेच्या सगळे क्रोधित होऊन यमपुरीला गेले आणि यमदूतांना मारहाण करून, त्यांना वारंवार धमकावून त्यांनी देवराजला त्यांच्या तावडीतून सोडवले आणि अत्यंत अद्भुत विमानात बसवून जेव्हा ते शिवदूत कैलासाला जाण्यास उद्यत झाले तेव्हा यमपुरीमध्ये कोलाहल माजला. तो कोलाहल ऐकून धर्मराज आपल्या भवनातून बाहेर आले. साक्षात् दुसऱ्या रुद्रांप्रमाणे प्रतीत होणाऱ्या त्या चार देवदूतांना पाहून धर्मज्ञ धर्मराजाने विधिपूर्वक त्यांचे पूजन केले. यमराजाने ज्ञानदृष्टीने पाहून संपूर्ण वृत्तांत जाणला, भीतीपोटी त्यांनी भगवान् शंकरांच्या त्या महात्मा दूतांना काहीही विचारले नाही. यमराजाद्वारा पूजित आणि प्रार्थित होऊन ते शिवदूत कैलासाला निघून गेले आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला दयासागर साम्बशिवांच्या चरणी अर्पण केले.
शिवपुराणाची ही परमपवित्र कथा धन्य आहे, जी ऐकल्यामुळे पापीजन सुद्धा मुक्तियोग्य होतात. भगवान् सदाशिवांच्या परमधामाला वेदज्ञ लोक सर्व लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ मानतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अन्य प्राणी, एवढेच नव्हे तर ज्या पापी मनुष्याने धनाच्या लोभाने अनेक लोकांची हत्या केली व आपल्या माता-पित्याला आणि पत्नीला ठार मारले, तो वेश्यागामी, दारुडा ब्राह्मण देवराज देखील या कथेच्या प्रभावामुळे भगवान् शंकरांच्या परमधामाला प्राप्त होऊन त्याक्षणी मुक्त झाला.
अश्याप्रकारे श्रीस्कन्दमहापुराणाच्या अंतर्गत शिवपुराणमाहात्म्यमध्ये देवराजमुक्तिवर्णन नामक दुसरा अध्याय पूर्ण झाला.
