श्रीशिवमहापुराण – माहात्म्य अध्याय १


श्रीशिवमहापुराण
नमस्कार
आज पासून आपण श्रीशिवमहापुराण कथा सुरु करत आहोत. शिवपुराण माहात्म्यापासून आपण एक एक अध्याय सविस्तरपणे जाणून घेऊ या.
माहात्म्य
अध्याय पहिला

मुनिश्रेष्ठ श्रीशौनक म्हणाले, सर्व सिद्धांताचे जाणकार महाज्ञानी सूत तुम्ही पुराण कथांचे सारतत्त्व वर्णन करा. सदाचार, भगवद्भक्ति आणि विवेक यांची वृद्धी कशी होते ? आणि सज्जन पुरुष कश्याप्रकारे कामक्रोधादी मानसिक विकारांचे निवारण करतात? या घोर कलियुगात जीव (मनुष्य) साधारणतः आसुर स्वभावाचे झालेले आहेत, त्यांना शुद्ध करण्याचे किंवा दैवी संपत्तीने युक्त करण्याचे सर्वश्रेष्ठ उपाय कोणते? मला असे शाश्वत साधन सांगा जे कल्याणकारी वस्तुंमध्ये सर्वोत्कृष्ट व परम मंगलकारी असेल आणि पवित्र करणाऱ्या उपायांमध्ये सुद्धा सर्वोत्तम पवित्रकारक उपाय असेल. मला असे साधन सांगा की ज्याचे अनुष्ठान केले असता अन्तःकरण लगेच शुद्ध होते आणि निर्मल चित्त असणाऱ्या मनुष्याला नेहमी करता शिवप्राप्ती होते.
सूत म्हणाले, मुनिश्रेष्ठ शौनक तुम्ही धन्य आहात. तुमच्या हृदयात पुराणकथा ऐकण्याची विशेष लालसा आणि प्रेम आहे म्हणून मी शुद्ध बुद्धीने विचार करून परम उत्तम शास्त्राचे वर्णन करतो. सर्व शास्त्रसिद्धांतांनी सम्पन्न, भक्ति वाढवणाऱ्या, भगवान् शंकरांना संतुष्ट करणाऱ्या आणि कानांना रसायन स्वरूप दिव्य पुराणाचे श्रवण करा. हे उत्तम असे शिवपुराण कालरूपी सर्पापासून उद्भवणाऱ्या महान् त्रासांचा विनाश करणारे आहे. पूर्वी भगवान शंकरांनी स्वतः याचे कथन केले आहे. गुरुदेव व्यासांनी सनत्कुमार मुनींच्या उपदेशानुसार कलियुगातील मनुष्यप्राण्यांच्या कल्याणाकरता अत्यंत आदराने या पुराणाचे प्रतिपादन केले आहे. विशेषत्वाने कलियुगातील मनुष्यांच्या चित्तशुद्धी करता शिवपुराणा व्यतिरिक्त अन्य कोणतेही साधन नाही. ज्या बुद्धिमान मनुष्याचे पूर्वजन्मी चे महानपुण्य असते त्याच महाभाग्यशाली व्यक्तीचे या पुराणाप्रति प्रेम असते. हे शिवपुराण परम उत्तम शास्त्र आहे. या भूतलावर याला भगवान शंकराचे वाङ्मय स्वरूप समजले पाहिजे आणि सर्वप्रकारे याचे अध्ययन केले पाहिजे. या शिवपुराणाच्या पठण-श्रवणाने शिवभक्ति प्राप्त झालेला श्रेष्ठतम स्थितीला पोहचलेला मनुष्य लगेचच शिवपद प्राप्त करून घेतो. म्हणून संपूर्ण प्रयत्नांनी मनुष्याने या पुराणाच्या अध्ययनाला अभीष्ट साधन मानले आहे व याचे श्रवण सुद्धा वांछित फळ देणारे आहे. या शिवपुराणाच्या श्रवणाने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो आणि उत्कृष्ट भोगांचे उपभोग घेत शेवटी शिवलोकी जातो. राजसूययज्ञ आणि शेकडों अग्निष्टोमयज्ञांनी जे पुण्य प्राप्त होते, ते शिवकथेच्या केवळ श्रवणाने प्राप्त होते. जे लोक या श्रेष्ठ शास्त्र शिवपुराणाचे श्रवण करतात त्यांना मनुष्य समजू नाही ते रुद्रस्वरूपच असतात, यामध्ये कोणतीही शंका नाही. या पुराणाचे श्रवण कीर्तन करणाऱ्यांच्या चरणकमलांची धूळ मुनिगण तीर्थच समजतात. जे मनुष्य परमपदाची इच्छा करतात त्यांनी सदैव या निर्मल शिवपुराणाचे श्रवण केले पाहिजे. जर मनुष्य सदैव ऐकू शकत नसेल तर दररोज स्थिर चित्ताने एक मुहूर्त तरी ऐकावे. जर दररोज ऐकणे शक्य नसेल तर पवित्र महिन्यांमध्ये या शिवपुराणाचे श्रवण करावे. जे लोक एक मुहूर्त, त्याचा अर्धा, त्याचा अर्धा, किंवा क्षणभर देखील या पुराणाचे श्रवण करतात त्यांची दुर्गती होत नाही. जो ही शिवपुराण कथा ऐकतो तो पुरुष कर्मरूपी महावन जाळून संसार पार करतो. सर्व दानांचे आणि सर्व यज्ञांचे जे पुण्य मिळते, ते फळ शिवपुराणाच्या श्रवणाने निश्चल होते. विशेषत्वाने या कलियुगात शिवपुराणाच्या श्रवणा व्यतिरिक्त मनुष्याला मुक्ति देणारे दुसरे कोणतेही श्रेष्ठ साधन नाही. शिवपुराणाचे श्रवण आणि भगवान शंकराचे नामसंकीर्तन दोन्हीही मनुष्याला कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणारे आहे, यात काहीही संदेह नाही. कलियुगात धर्माचरण रहित दुर्बुद्धी मनुष्य़ांच्या उद्धाराकरता भगवान शंकरांनी अमृतरसासमान शिवपुराण ची उद्भावना केली. अमृतपान करणारा केवळ तोच मनुष्य अजर-अमर होतो परंतु शिवकथामृत संपूर्ण कुळालाच अजर-अमर करतं. या परम पवित्र शिवकथेचे विशेषरूपाने सदैव सेवन करायला पाहिजे. याच्या केवळ श्रवणाने भगवान सदाशिव त्या मनुष्याच्या हृदयात विराजमान होतात.
हा शिवपुराण नामक ग्रन्थ चोवीस हजार श्लोकांनी युक्त आहे. यामध्ये सात संहिता आहेत. भक्ति, ज्ञान आणि वैराग्याने संपन्न मनुष्याने अत्यंत आदराने याचे श्रवण करावे. विद्येश्वरसंहिता पहिली, दुसरी रुद्रसंहिता, तिसरी शतरुद्रसंहिता, चौथी कोटिरुद्रसंहिता, पाचवी उमासंहिता, सहावी कैलाससंहिता आणि सातवी वायवीय संहिता याप्रकारे यामध्ये सात संहिता आहेत.
सात संहितांनी युक्त हे दिव्य शिवपुराण परब्रह्म परमात्म्याप्रमाणे विराजमान आहे आणि सर्वात उत्कृष्ट गती प्रदान करणारे आहे. जो मनुष्य ह्या सात संहितावाल्या या शिवपुराणाचे अत्यंत आदरपूर्वक संपूर्ण पठण करतो तो जीवन्मुक्त म्हटला जातो. जोपर्यंत या उत्तम शिवपुराणाचे श्रवण करण्याची सुवर्ण संधी येत नाही तोपर्यंत अज्ञानवश मनुष्य या संसार चक्रात भटकत राहतो. भ्रमित करणाऱ्या अनेक शास्त्र आणि पुराणांच्या श्रवणाचा काय लाभ आहे जेव्हा की एक शिवपुराणच मुक्ति प्रदान करण्याची गर्जना करत आहे. ज्या घरात या शिवपुराणाची कथा होते ते घर तीर्थस्वरूपच आहे आणि त्यामध्ये राहणाऱ्यांची पापं ही नष्ट करतं. हजारों अश्वमेधयज्ञ आणि शेकडों वाजपेययज्ञ शिवपुराणाच्या सोळाव्या कलेची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीत. कोणी अधम मनुष्य जोपर्यंत भक्तिपूर्वक शिवपुराणाचे श्रवण करत नाही, तोपर्यंतच त्याला पापी म्हटले जाऊ शकते. गंगा इत्यादी सप्त नद्या, मुक्तिदायीनिसप्त पुरी आणि गया तीर्थ या शिवपुराणाची बरोबरी कधी करू शकत नाहीत. ज्याला परमगतीची कामना असेल त्याने नित्य शिवपुराणाचा एक श्लोक किंवा अर्ध्या श्लोकाचे सुद्धा स्वतः भक्तिपूर्वक पठण करायला पाहिजे. निरंतर जो व्यक्ती सतत अर्थ समजून घेण्याच्या भावनेने, मन लावून व चिंतनपूर्वक शिवपुराण वाचतो किंवा नित्य प्रेमपूर्वक याचे फक्त पठण करतो तो पुण्यात्मा आहे, यामध्ये काही संशय नाही. जो उत्तम बुद्धीवाला पुरुष अन्तकाळी भक्तिपूर्वक या पुराणाचे श्रवण करतो, त्याच्यावर अत्यंत प्रसन्न झालेले भगवान महेश्वर त्याला आपले पद (धाम) प्रदान करतात. जो दररोज आदरपूर्वक या शिवपुराणाचे पूजन करतो तो या संसारात संपूर्ण भोग भोगून शेवटी भगवान् शंकरांचे पद प्राप्त करतो. जो दररोज आळस न करता रेशमी वस्त्र परिधान करून या शिवपुराणाचा सत्कार करतो तो सदैव सुखी होतो. हे शिवपुराण निर्मल आणि शैवांचे सर्वस्व आहे. इहलोकी आणि परलोकी सुखाची इच्छा करणाऱ्यांनी आदरपूर्वक व प्रयत्नपूर्वक याचे सेवन (पठण-श्रवण) केले पाहिजे. हे निर्मळ आणि उत्तम शिवपुराण धर्म, अर्थ, काम आणि मोक्षरूप चारही पुरुषार्थ देणारे आहे म्हणून सदैव प्रेमपूर्वक याचे श्रवण व विशेष रूपाने पठण करायला पाहिजे. वेद, इतिहास आणि अन्य शास्त्रांमध्ये हे शिवपुराण विशेष कल्याणकारी आहे, असे मुमुक्षुंनी समजले पाहिजे. हे शिवपुराण आत्मतत्त्वज्ञांकरता सदैव सेवनीय आहे, सत्पुरुषांकरता पूजनीय आहे, तीनही प्रकारच्या तापांचे शमन करणारे आहे, सुख प्रदान करणारे आहे आणि ब्रह्मा-विष्णु-महेशादि देवतांना प्राणासमान प्रिय आहे. अश्या शिवपुराणाला मी प्रसन्नचित्ताने सदैव वंदन करतो. भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न होवो आणि आपल्या चरणकमळाची भक्ति मला प्रदान करो.
अश्याप्रकारे श्रीस्कन्दपुराणान्तर्गत शिवपुराण माहात्म्यामध्ये त्याचा महिमावर्णन नामक पहिला अध्याय पूर्ण झाला.

1 thought on “श्रीशिवमहापुराण – माहात्म्य अध्याय १”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top