श्रीशिवमहापुराण – माहात्म्य अध्याय ४

अध्याय चौथा

चंचुलेच्या विनंतीनुसार ब्राह्मणाचे तिला पूर्ण शिवपुराण ऐकवणे आणि कालांतराने शरीर सोडून शिवलोकी जाऊन चंचुलाचे पार्वतीची सखी होणे

ब्राह्मण म्हणाले, सौभाग्याची बाब आहे की भगवान शंकरांच्या कृपेने शिवपुराणची ही वैराग्ययुक्त आणि श्रेष्ठ कथा ऐकून तुला योग्यवेळी ज्ञान झाले. हे ब्राह्मणपत्नी ! तू घाबरू नको. भगवान शंकारांना शरण जा. शिवकृपेने संपूर्ण पाप तत्काळ नष्ट होते. मी तुला भगवान शंकरांच्या कीर्तिकथेने युक्त त्या परम वस्तु चे वर्णन करतो ज्यामुळे तुला सदैव सुख देणारी उत्तम गती प्राप्त होईल.

भगवान् शंकरांची उत्तम कथा ऐकण्यानेच तुझी बुद्धी अश्याप्रकारे पश्चात्तापाने युक्त आणि शुद्ध झाली आहे, शिवाय तुझ्या मनात विषयांप्रति वैराग्य उत्पन्न झाले आहे. पश्चात्तापच पाप करणाऱ्या पापीजनांकरता सर्वात मोठे प्रायश्चित्त आहे. सत्पुरुषांनी सगळ्या करता पश्चात्तापालाच सर्व पापांचे शोधक सांगितले आहे अर्थात् सर्व पाप दूर करणारे साधन सांगितले आहे. पश्चात्तापानेच सर्व पापांची शुद्धी होते. जो पश्चात्ताप करतो, तोच वास्तविकपणे पापांचे प्रायश्चित्त करतो, कारण सत्पुरुषांनी संपूर्ण पापांच्या शुद्धी करता जसे प्रायश्चित्ताचा उपदेश केला आहे, तो सर्व पश्चात्तापाने संपन्न होतो. जो पुरुष विधिपूर्वक प्रायश्चित्त करून निर्भय होतो पण आपल्या कुकर्माबद्दल पश्चात्ताप करत नाही त्याला उत्तम गती प्राप्त होत नाही. परंतु ज्याला आपल्या कुकृत्याचा मनापासून पश्चात्ताप होतो तो अवश्य उत्तम गतीचा भागी होतो, यामध्ये संशय नाही. ही शिवपुराणकथा ऐकल्याने जशी चित्तशुद्धी होते, तशी दुसऱ्या कोणत्याच उपायांनी होत नाही. ज्याप्रमाणे आरसा साफ केल्याने निर्मल होतो, त्याच प्रमाणे ही शिवपुराणकथा ऐकल्याने चित्त अत्यंत शुद्ध होते, यात संशय नाही. मनुष्यांच्या शुद्ध चित्तामध्ये जगदम्बा पार्वतीसोबत भगवान् शंकर विराजमान असतात. यामुळे तो विशुद्धात्मा पुरुष श्रीसाम्बसदाशिवांच्या परम पदाला प्राप्त होतो.

अश्याप्रकारे हे कथारूपी साधन सर्व प्राणिमात्रांकरता उपकारी आहे आणि याकारणानेच महादेवांनी याचे आग्रहपूर्वक प्राकट्य केले. या कथेमुळे भगवान् उमापतींचे ध्यान सिद्ध होते. त्या ध्यानामुळे परम ज्ञान आणि त्याने मोक्षप्राप्ती निश्चित होते. भगवान् शंकराच्या ध्यानात मग्न न होता जर कोणी ही केवळ कथा ऐकली तर तो पुढील जन्मी भगवंताची ध्यान सिद्धी प्राप्त करून परमपदाला प्राप्त होतो. या कथा श्रवणानी भगवान शंकरांचे ध्यान करून पश्चात्ताप करणारे पापी पुरुष सिद्धीला पोहचले आहे.  

या उत्तम कथेचे श्रवण सर्व मनुष्यांकरता कल्याणाचे बीज आहे. म्हणून यथोचित मार्गाने याची आराधना किंवा सेवा केली पाहिजे. या कथेचे श्रवण भवबन्धरूपी रोगाचा नाश करणारे आहे. भगवान शंकरांची कथा ऐकून आपल्या हदयात त्याचे मनन व निदिध्यासन केल्याने पूर्णपणे चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी झाल्याने महेश्वरांची भक्ति आपल्या दोन्ही पुत्रांसोबत (ज्ञान आणि वैराग्य) निश्चितच प्रकट होते. त्यानंतर महेश्वरांच्या अनुग्रहाने दिव्य मुक्ति प्राप्त होते, यात संशय नाही. जो शिवभक्तिपासून वंचित आहे त्याला पशुच समजले पाहिजे कारण त्याचे चित्त मायेच्या बंधनात आसक्त आहे. तो निश्चितच संसारबंधनातून मुक्त होत नाही.

हे ब्राह्मणपत्नी ! म्हणूनच तू विषयांपासून आपले मन दूर कर आणि भक्तिभावाने भगवानशंकरांची ही परमपावन कथा ऐक. परमात्मा शंकरांची ही कथा ऐकल्याने तुझे चित्त शुद्ध होईल आणि त्यामुळे तुला मोक्षप्राप्ती होईल. निर्मळ चित्ताने भगवान शंकरांच्या चरणारविंदाचे चिंतन करणाऱ्याला एकाच जन्मात मुक्ति मिळते, हे मी सत्य सांगतोय.

सूत म्हणाले, शौनक ! एवढे बोलून ते श्रेष्ठ शिवभक्त ब्राह्मणानी मौन धारण केले. त्यांचे हृदय करुणार्द्र झाले. ते शुद्धचित्त महात्मा भगवान शंकरांच्या ध्यानात मग्न झाले. त्यानंतर बिन्दुकपत्नी चंचुला मनातल्या मनात आनंदित झाली. ब्राह्मणाचा हा उपदेश ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. ती ब्राह्मणपत्नी चंचुला हर्षित हृदयाने त्या श्रेष्ठ ब्राह्मणाच्या चरणी नतमस्तक झाली आणि हात जोडून म्हणाली “मी कृतार्थ झाले”. त्यानंतर उठून वैराग्ययुक्त आणि उत्तम बुद्धीची ती स्त्री, जी आपल्या पापांमुळे आतंकित (भयभीत) होती, त्या महान् शिवभक्त ब्राह्मणाला हात जोडून गद्गद् वाणीने म्हणाली, हे ब्रह्मन् ! शिवभक्तांमध्ये श्रेष्ठ तुम्ही धन्य आहात, परमार्थदर्शी आहात आणि सदैव परोपकारामध्ये गुंतलेले असता, म्हणून तुम्ही श्रेष्ठ साधु पुरुषांमध्ये प्रशंसेला पात्र आहात. हे साधो ! मी नरकाच्या समुद्रात पडत आहे. तुम्ही माझा उद्धार करा. पौराणिक अर्थतत्त्वाने सम्पन्न ज्या सुंदर शिवपुराणाची कथा ऐकून माझ्या मनात सर्व विषयांप्रति वैराग्य उत्पन्न झाले, तेच शिवपुराण ऐकण्याकरता यावेळी माझ्या मनात अतिशय श्रद्धा उत्पन्न झाली आहे.

सूत म्हणाले, असे म्हणून हात जोडून त्यांचा अनुग्रह घेऊन चंचुला शिवपुराण कथा ऐकण्याची इच्छा मनात घेऊन त्या ब्राह्मणदेवतेच्या सेवेमध्ये तत्पर होऊन तिथे राहू लागली. त्यानंतर शिवभक्तांमध्ये श्रेष्ठ आणि शुद्ध बुद्धीवाल्या त्या ब्राह्मण देवताने त्याच स्थानी त्या स्त्रीला उत्तम अशी शिवपुराणकथा ऐकवली. अश्याप्रकारे गोकर्ण नामक महाक्षेत्रामध्ये त्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडून तिने शिवपुराणाची ती उत्तम कथा ऐकली, जी भक्ति, ज्ञान आणि वैराग्य वाढवणारी आणि मुक्ति देणारी आहे. ती परम उत्तम कथा ऐकून ती ब्राह्मणपत्नी अत्यंत कृतार्थ झाली. त्या सद्गुरुंच्या कृपेने तिचे चित्त लगेच शुद्ध झाले, भगवान शंकरांच्या अनुग्रहाने तिच्या हृदयात शंकराच्या सगुणरूपाचे चिंतन सुरु झाले. अश्याप्रकारे सद्गुरुंचा आश्रय घेऊन तिने भगवान् शिवांमध्ये एकाग्र राहणारी उत्तम बुद्धी प्राप्त करून शिवांच्या सच्चिदानन्दमय स्वरूपाचे वारंवार चिन्तन आरम्भ केले. दररोज ती तीर्थजलात स्नान करून जटा आणि वल्कल धारण करू लागली आणि सर्वांगी भस्म लावून रुद्राक्षांची आभूषणे परिधान करू लागली. ती भगवान् शिवजींच्या नामजपात तल्लीन राहू लागली, संयमित वाणी आणि अल्पाहार करत गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने ती शिवजींना प्रसन्न करू लागली. हे शौनक ! अश्याप्रकारे शम्भुंचे उत्तम ध्यान करत त्या चंचुलाचा पुष्कळ काळ लोटला. त्यानंतर काळ पूर्ण झाल्यावर भक्ति, ज्ञान आणि वैराग्याने युक्त चंचुलाने आपल्या शरीराचा काहीही कष्ट न होता त्याग केला.  इतक्यातच त्रिपुरशत्रु भगवान शिवजींनी पाठवलेले एक दिव्य विमान द्रुत गतीने तिथे पोहचले, जे त्यांच्या गणांनी युक्त आणि शोभा साधनांनी संपन्न होते. चंचुला त्या विमानावर आरूढ झाली आणि भगवान् शिवजींच्या श्रेष्ठ पार्षदांनी तिला तात्काळ शिवपुरीमध्ये पोहचवले. तिचे सगळे डाग धुतले गेले. ती दिव्यरूपधारिणी दिव्यांगना झाली. तिचे दिव्यावयव तिची शोभा वाढवित होते. मस्तकवर अर्धचन्द्राचे मुकुट धारण केलेली ती गौरांगी देवी शोभाशाली दिव्य आभूषणांनी विभूषित होती.

तिथे पोहचल्यावर तिने त्रिनेत्रधारी महादेवजींना पाहिले. ब्रह्मा, विष्णु आदि देवता त्या सनातन शिवजींची सेवा करीत होते. गणेश, भृंगी, नंदीश, वीरभद्रेश्वर आदि गण भक्तिपूर्वक त्यांची उपासना करत होते. त्यांची अंगकांती करोडों सूर्यांसमान प्रकाशित होत होती. कण्ठावर नीळेचिह्न शोभत होते. त्यांचे पाच मुख होते आणि प्रत्येक मुखावर तीन-तीन नेत्र होते. मस्तकावर अर्धचंद्राकार मुकुट शोभत होते. त्यांनी त्यांच्या वामांगी गौरी देवीला बसवले होते, जी विद्युत पुंजाप्रमाणे प्रकाशित होत होती. गौरीपती महादेवजींची कांती कापराप्रमाणे गौरवर्णी होती. त्यांनी सर्व अलंकार धारण केले होते, त्यांचे संपूर्ण शरीर श्वेतभस्माने झळकत होते. शरीरावर श्वेत वस्त्रे शोभित होती, ती अत्यंत उज्ज्वल वर्णाची होती.   

अश्याप्रकारे परमोज्ज्वल भगवान् शंकरांचे दर्शन घेऊन ती ब्राह्मणपत्नी चंचुला अतिशय आनंदित झाली. अत्यंत प्रीतियुक्त होऊन तिने उतावीळ होऊन वारंवार भगवान् शिवजींना नमस्कार केला. मग हात जोडून ती अतिशय प्रेम व आनंद आणि संतोषाने परिपूर्ण होऊन विनयभावाने उभी राहिली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रुंची अखंड धारा वाहू लागली आणि संपूर्ण शरीर रोमांचित झाले. त्यावेळी भगवती पार्वती आणि भगवान् शंकरांनी तिला अत्यंत करुणेने आपल्याजवळ बोलावले आणि सौम्य दृष्टीने तिच्याकडे बघितले. पार्वतीने तर दिव्यरूपधारिणी बिन्दुगप्रिया चंचुलाला प्रेमपूर्वक आपली सखी बनवले. ती त्या परमानंदघन ज्योतिःस्वरूप सनातन धामामध्ये अविचल निवास प्राप्त करून दिव्य सौख्याने संपन्न होऊन अक्षय सुखाचा अनुभव घेऊ लागली.

अश्याप्रकारे श्रीस्कन्दमहापुराणान्तर्गत शिवपुराणमाहात्म्यामध्ये चंचुलासद्गतिवर्णन नामक चौथा अध्याय पूर्ण झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top