श्रीशिवमहापुराण – माहात्म्य अध्याय ६

अध्याय सहावा

शिवपुराण श्रवणविधी

शौनकजी म्हणाले, हे महाप्राज्ञ ! हे व्यासशिष्य ! हे सूतजी ! तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही धन्य आहात आणि शिवभक्तांमध्ये श्रेष्ठ आहात. तुमचे महान् गुण वर्णन करण्यायोग्य आहे. आता तुम्ही कल्याणमय शिवपुराण श्रवणाचा विधी सांगा, ज्यामुळे सर्व श्रोत्यांना संपूर्ण उत्तम फळप्राप्ती होऊ शकेल.

सूतजी म्हणाले, हे शौनक ! हे मुने ! आता मी तुम्हाला संपूर्ण फळप्राप्ती करता शिवपुराणाचा श्रवणविधी सांगतो. सर्वप्रथम कोण्या ज्योतिष्याला बोलावून दान व मान देऊन संतुष्ट करून आपले सहयोगी लोकांसोबत बसून कोणत्याही विघ्नाशिवाय कथेची समाप्ती होण्याच्या उद्देशाने शुद्ध मुहूर्ताचे अनुसंधान करावे. त्यानंतर प्रयत्नपूर्वक सगळ्याठिकाणी प्रत्येक स्थानी हा शुभ संदेश पाठवावा की आमच्या येथे शिवपुराणकथा होणार आहे, आपल्या कल्याणाची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य यावे. काही लोक भगवान् श्रीहरीच्या कथेपासून दूर झाले आहेत आणि कित्येक स्त्रिया, शूद्र इत्यादि भगवान् शंकरांच्या कथा कीर्तनापासून वंचित राहतात, त्या सगळ्यांना सुद्धा सूचित केले जाईल अशी व्यवस्था करावी. देशांदेशात जे भगवान शिवजींचे भक्त असतील आणि शिवकथा कीर्तन आणि श्रवणामध्ये उत्सुक असतील, त्यासर्वांना आदरपूर्वक बोलवायला पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे, इथे सत्पुरुषांना आनंद देणारा समाज आणि अति अद्भुत उत्सव होणार आहे, ज्यामध्ये शिवपुराणाचे पारायण होईल. श्रीशिवपुराणाची रसमयी कथा ऐकण्याकरता तुम्ही लोकांनी प्रेमाने लवकर यावे ही विनंती. जर वेळेचा अभाव असेल तर प्रेमपूर्वक एका दिवसाकरता तरी या. तुम्ही नक्कीच यायला पाहिजे कारण याकथेमध्ये क्षणभर सुद्धा बसण्याचे सौभाग्य दुर्लभ असते. अश्याप्रकारे विनय आणि प्रसन्नतापूर्वक श्रोत्यांना निमंत्रण द्यायला पाहिजे आणि आलेल्या लोकांचा सगळ्या प्रकारे आदर-सत्कार करायला पाहिजे.

शिवमंदिरात, तीर्थक्षेत्री, वनप्रांतात किंवा घरी शिवपुराणाची कथा ऐकण्याकरता उत्तम स्थान निर्माण करायला पाहिजे. कथास्थळ लेपून शुद्ध करावे आणि धातू इत्यादींनी त्या स्थानाला सुशोभित करावे. महोत्सवासोबत तिथे अद्भुत आणि सुंदर व्यवस्था करावी. कथेकरता घरातील अनुपयोगी साज-सामान दूर करून एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्यावे.

केळीच्या खाब्यांनी सुशोभित असे एक उंच कथामंडप तयार करावे. त्याला सगळ्या बाजुंनी फल-पुष्पादिंनी आणि सुंदर चांदोव्याने (मंडपछत्र) अलंकृत करावे आणि चारही बाजूला ध्वजापताका लावून विविध वस्तुंनी सजवून सुंदर शोभासंपन्न बनवावे. भगवान् शंकरांच्या प्रति सर्वप्रकारे उत्तम भक्ति करावी, कारण तिच सर्व प्रकारे आनंद प्रदान करणारी आहे. परमात्मा भगवान् शंकरजींकरता दिव्य आसन निर्माण करावे आणि कथा वाचकाकरता सुद्धा एक दिव्य असे आसन बनवले पाहिजे, जे त्यांच्याकरता सुखद असेल. हे मुने ! नियमपूर्वक कथा ऐकणाऱ्या श्रोत्यांकरतासुद्धा यथायोग्य सुंदर स्थानीं व्यवस्था करावी. अन्य लोकांकरताही सामान्यपणे स्थान बनवावे. हे शौनकजी ! विवाहोत्सवात जशी उल्लासपूर्ण मनःस्थिती असते तशीच या कथोत्सवात असली पाहिजे. सगळ्याप्रकारच्या लौकिक चिंता विसरून जाव्यात. वक्ता उत्तराभिमुख आणि श्रोतागण पूर्वाभिमुख मांडी घालून बसावे. याविषयी काही विरोध नाही की पूज्य-पूजकाच्या मध्ये पूर्व दिशा असावी आणि वक्ताच्या समोर श्रोत्यांचे मुख असावे, असे म्हटले आहे.

पौराणिक वक्ता व्यासासनावर जो पर्यंत विराजमान असतील तोपर्यंत प्रसंग समाप्तिच्या आधी कोणालाही नमस्कार करू नाही. पुराणाचा विद्वान वक्ता कसा ही असो लहान, तरुण, वृद्ध, दरिद्री किंवा दुर्बल जसा ही असेल, पुण्याची इच्छा करणाऱ्यांकरता तो सदैव वन्दनीय आणि पूज्य असतो. ज्याच्या मुखातून निघालेली वाणी देहधारी लोकांकरता कामधेनु समान अभीष्ट फळ देणारी असते, त्या पुराणवेत्ता वक्त्याप्रती तुच्छबुद्धी कधीही नसावी. या संसारात जन्म आणि गुणांचे कारण अनेक गुरु असतात, परंतु त्यासगळ्यांमध्ये सर्व पुराणांचे ज्ञाता विद्वान च परम गुरु मानले आहे. करोडो योनींमध्ये जन्म घेऊन दुःख भोगत प्राण्यांना जो मुक्ति प्रदान करतो, त्या पुराणवक्त्यापेक्षा दुसरा मोठा गुरु कोण असू शकतो ?

पुराणवेत्ता पवित्र, दक्ष, शान्ति, ईर्ष्येवर विजय मिळवणारा, साधु आणि दयाळू असायला पाहिजे. असा प्रवचनकुशल विद्वानच पुण्यमयी कथा सांगणारा असावा. सूर्योदयापासून आरम्भ करून साडेतीन प्रहर पर्यंत उत्तम बुद्धिवाल्या विद्वान पुरुषाने शिवपुराणकथा योग्यप्रकारे वाचली पाहिजे. जे धूर्त, दुराचारी आणि दुसऱ्यांशी विवाद करणारे आणि प्रपंची लोक आहेत त्या कुटिलवृत्तीच्या लोकांसमोर ही कथा करू नाही. दुष्टांनी भरलेल्या आणि डाकूंनी घेरलेल्या प्रदेशात आणि धूर्त व्यक्तींच्या घरात ही पवित्र कथा करू नाही. मध्याह्नकाळी दोन घडी ही कथा बंद ठेवायला पाहिजे, ज्यामुळे कथा-कीर्तनातून अवकाश मिळून लोकं शौच आदि क्रिया आटपू शकतील. कथा सुरु होण्याच्या एक दिवस आधी व्रत ग्रहण करण्यासाठी वक्त्याने क्षौर करावे. ज्या दिवसात कथा चालू असेल, त्या दिवसात प्रयत्नपूर्वक प्रातःकाळ चे सारे नित्यकर्म संक्षेपाने आटपून घ्यावे. वक्त्याजवळ त्याच्या साहाय्यासाठी एक दुसरा तसाच विद्वान् नेमावा, जो सगळ्याप्रकराचे संशय निवृत्त करण्यास समर्थ आणि लोकांना समजविण्यात कुशल असावा. कथेमध्ये येणाऱ्या विघ्नांना दूर करण्याकरता गणेशजींची पूजा करावी. कथेचे स्वामी भगवान् शिवजींची आणि विशेषतः शिवपुराण ग्रंथाची भक्तिभावाने पूजा करावी. त्यानंतर उत्तम बुद्धीवाल्या श्रोत्याने विधिपूर्वक तन-मनाने शुद्ध आणि प्रसन्नचित्त होऊन आदरपूर्वक शिवपुराणकथा ऐकावी. जे वक्ते आणि श्रोते अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये भटकत असतात, कामादी सहा विकारांनी युक्त असतात, स्त्रीमध्ये आसक्त असतात आणि पाखण्डी वचन बोलतात, ते पुण्याचे भागी नसतात. जे लौकिक चिंता, धन, गृह आणि पुत्रादींची चिंता सोडून कथेमध्ये मन लावतात, त्या शुद्धबुद्धीच्या पुरुषांना उत्तम फळाची प्राप्ती होते. श्रद्धा आणि भक्ति युक्त, दुसऱ्या कर्मांमध्ये मन न लावणारे, मौन धारण करणारे, पवित्र आणि उद्वेगशून्य श्रोतेच पुण्याचे भागी होतात. जे नराधम भक्तिरहित होऊन या पुण्यमयी कथेचे श्रवण करतात, त्यांना श्रवणाचे काहीही फळ मिळत नाही आणि ते जन्म-जन्मांतर क्लेश भोगत राहतात. यथाशक्ति विधिपूर्वक या पुराणाची पूजा केल्याशिवाय जे मूढजन ही कथा ऐकतात, ते अपवित्र आणि दरिद्री होतात. कथा सुरु असताना जे लोकं मध्येच उठून अन्यत्र चालले जातात, त्यांच्या पुढील जन्मात त्यांची पत्नी आदी सम्पत्ति नष्ट होते. जे पुरुष डोक्यावर पगडी इत्यादी धारण करून ही कथा श्रवण करता, त्यांना पापी आणि कुलकलंकी पुत्र प्राप्त होतात. जे पुरुष पान खात ही कथा ऐकतात, त्यांना नरकात यमदूत त्यांचीच विष्ठा खाऊ घालतात. जे लोक उंच आसनावर बसून ही कथा श्रवण करतात, ते संपूर्ण नरक भोगून काकयोनीमध्ये जन्म घेतात. जे लोक वीरासन आदि धारण करून ही शुभ कथा ऐकतात, ते अनेक नरकांना भोगून विषवृक्ष म्हणून जन्म घेतो. कथा करणाऱ्या पौराणिकाला योग्य प्रकरे नमस्कार न करता जे लोक कथा ऐकतात, ते सगळे नरकांना भोगून अर्जुनवृक्ष बनतात. रोगी नसताना सुद्धा जे लोक आडवे होऊन कथा ऐकतात, ते सगळे नरकांना भोगून शेवटी अजगर इत्यादि योनींमध्ये जन्म घेतात. वक्त्यासमोर उंच आसनावर बसून जे ही कथा ऐकतात त्या नारकीय लोकांना गुरुशय्यावर शयन करण्यासारखे पाप लागते. जे या पवित्र कथेची किंवा वक्त्याची निंदा करतात, ते शंभर जन्मांपर्यंत दुःख भोगून पुत्र्याचा जन्म घेतात. कथा सुरु असताना जे अशुद्ध/ खराब वचन बोलतात ते घोर नरक भोगल्यानंतर गाढवाचा जन्म घेतात. जे कधीही या परम पवित्र कथेचे श्रवण करत नाहीत, ते घोर नरक भोगून जंगली डुकराचा जन्म घेतात. जे दुष्ट कथेमध्ये विघ्न आणतात, ते करोडों वर्षे नरकयातना भोगून गावातील डुकराचा जन्म घेतात. याचा विचार करून शुद्ध आणि प्रेमपूर्ण मनाने बुद्धीमान श्रोत्याने वक्त्याप्रति भक्तिभाव ठेवून कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करावा. सर्वप्रथम कथेत येणाऱ्या विघ्नांचा नाश करण्यासाठी गणेशजींची पूजा करावी. आपले नित्य कर्म संक्षेपाने आटोपून प्रायश्चित्त करावे. नवग्रह आणि सर्वतोभद्र देवतांचे पूजन करून शिवपूजेच्या निर्दिष्ट विधिप्रमाणे शिवपुराणग्रंथाचे अर्चन करावे. पूजेच्या शेवटी विनम्रपणे भक्तिभावाने दोन्ही हात जोडून साक्षात् शिवस्वरूपी ग्रंथाची याप्रकारे स्तुती करावी – “श्रीशिवपुराणाच्या रूपात आपण प्रत्यक्ष सदाशिव आहात, आम्ही कथा ऐकण्याकरता आपल्याला अंगीकारले आहे. आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे. माझे जे मनोवांछित आहे ते आपण कृपापूर्वक पूर्ण करावे. माझे कथाश्रवण निर्विघ्नपणे सुसंपन्न व्हावे. कर्मरूपी शरीरात अडकलेल्या माझ्यासारख्या दीनाचा आपण संसारसागरातून उद्धार करावा. हे शंकरा ! मी आपला दास आहे”. अश्या प्रकारे साक्षात् शिवस्वरूप या शिवपुराणाची दीनतापूर्वक स्तुती करून वक्त्याची पूजा आरम्भ करावी. शिवपूजेच्या सांगितलेल्या विधीनुसार पुष्प, वस्त्र, अलंकार, धूप-दीपादींनी वक्त्याची पूजा करावी. त्यानंतर शुद्धचित्ताने त्यांच्यासमोर नियम स्वीकारावे आणि कथासंपेपर्यंत यथाशक्ती त्याचे प्रयत्नपूर्वक पालन करावे. (त्यानंतर कथावाचक व्यासजीं ची प्रार्थना करावी) हे व्यासजींसमान ज्ञानी श्रेष्ठ, शिवशास्त्राचे मर्मज्ञ ब्राह्मणदेवता ! तुम्ही या कथेच्या प्रकाशाने माझा अज्ञानान्धकार दूर करा. भक्तिपूर्वक पाच अथवा एक ब्राह्मण निवडा आणि त्यांच्याद्वारे शिवपंचाक्षर मंत्राचा (नमः शिवाय) जप करून घ्या. हे मुने ! अश्याप्रकारे मी भक्त श्रोत्यांद्वारा भक्तिपूर्वक कथाश्रवण करण्याचा उत्तम विधी तुम्हाला सांगितला, आता आपण काय ऐकू इच्छिता ?

अश्याप्रकारे श्रीस्कन्दमहापुराणान्तर्गत शिवपुराण माहात्म्यामध्ये श्रवणविधिवर्णन नामक सहावा अध्याय पूर्ण झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top