श्रीशिवमहापुराण – १.विद्येश्वरसंहिता – अध्याय १

प्रथमा विद्येश्वरसंहिता

पहिला अध्याय

प्रयाग मध्ये सूतजींना शीघ्र पापनाश करणाऱ्या साधनांविषयी मुनिंचा प्रश्न

जे आदि, अन्त्य (आणि मध्यातही) नित्य मंगलमय आहे, ज्यांची समानता आणि तुलना कुठेही नाही, जे आत्म्याचे स्वरूप प्रकाशित करणारे देवता (परमात्मा) आहे, ज्यांचे पाच मुख आहे आणि जे खेळाखेळात सहजतेने जगताची रचना, पालन, संहार, अनुग्रह आणि तिरोभावरूप पाच प्रबल कर्मे करत असतात, त्या सर्वश्रेष्ठ अजर-अमर ईश्वर अम्बिकापती भगवान शंकरजींचे मी मनातल्या मनात चिंतन करतो.

व्यासजी म्हणाले, जे धर्माचे महान क्षेत्र आहे, जिथे गंगा-यमुना यांचा संगम झाला आहे, जो ब्रह्मलोकाचा मार्ग आहे, त्या परम पुण्यमय प्रयाग मध्ये सत्यव्रत परायण (निष्ठावंत/श्रद्धा असलेला) महातेजस्वी, महाभाग (थोर) महात्मा मुनींनी एका विशाल ज्ञानयज्ञाचे आयोजन केले. त्या ज्ञानयज्ञाची सूचना ऐकताच पौराणिक शिरोमणी व्यासशिष्य महामुनी सूतजी मुनींचे दर्शन घेण्यासाठी तिथे आले. सूतजींना आलेले पाहून सगळे मुनीगण आनंदित झाले आणि अत्यंत प्रसन्नचित्ताने त्यांनी त्यांचे विधिवत् स्वागत केले. त्यानंतर त्या प्रसन्न महात्म्यांनी त्यांची विधिवत् स्तुती करून विधिपूर्वक हाथ जोडून त्यांना म्हटले – हे सर्वज्ञ विद्वान रोमहर्षणजी ! आपण खरोखर अतिशय भाग्यवान् आहात आणि त्यामुळेच आपण व्यासजींकडून यथार्थरूपाने संपूर्ण पुराणविद्या प्राप्त केली, म्हणूनच आपण अद्भूत कथांचे भांडार आहात- अगदी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे रत्नांनी परिपूर्ण असा समुद्र मोठमोठ्या मौल्यवान् रत्नांचे भांडार आहे. तीनही लोकांमध्ये भूत, वर्तमान आणि भविष्यातील व अन्यदेखील ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला अज्ञात नाहीत. आमच्या सौभाग्याने आपण या यज्ञाचे दर्शन घेण्याकरता येथे आले आहात आणि त्या निमित्त्याने आमचे कल्याण करणार आहात कारण तुमचे येणे निरर्थक नसते. आम्ही याआधी सुद्धा आपल्याकडून शुभाशुभ तत्त्वाचे पूर्ण वर्णन ऐकले आहे परंतु त्याने तृप्ती नाही झाली, आम्हाला ते पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होते. उत्तम बुद्धीवाले सूतजी ! यावेळी आम्हाला एकच गोष्ट ऐकायची आहे, जर तुमची कृपा असेल तर गोपनीय असून सुद्धा आपण त्या विषयाचे वर्णन करावे.

घोर कलियुग आल्यावर मनुष्य पुण्यकर्मापासून दूर होईल, दुराचारात अडकेल, सगळेच्या सगळे सत्य भाषणापासून विमुख होतील, दुसऱ्यांची निन्दा करण्यात तत्पर राहतील. दुसऱ्यांचे धन हडपण्याची इच्छा बाळगतील, त्यांचे मन परस्त्रीमध्ये आसक्त होईल आणि ते दुसऱ्या प्राण्यांची हिंसा करतील. ते आपल्या शरीरालाच आत्मा समजतील. ते मूर्ख, नास्तिक आणि पशु-बुद्धीवाले (पशुवृत्तीचे) होतील, आई-वडिलांचा द्वेष करतील आणि कामवश होऊन स्त्रियांच्या सेवेमध्ये लागतील. ब्राह्मण लोभरूपी ग्रहाचे भक्ष्य बनतील, वेद विकून उपजीविका चालवतील, धन मिळविण्याकरताच विद्याभ्यास करतील, मदाने मोहित राहतील, आपल्या जातीचे कर्म सोडून देतील, साधारणतः दुसऱ्यांना फसवतील, त्रिकाल सन्ध्योपासनेपासून दूर राहतील आणि ब्रह्मज्ञानात शून्य होतील. दयाहीन, स्वतःला पंडित मानणारे, सदाचार व्रतरहित, कृषिकार्यात तत्पर, क्रूर स्वभावाचे आणि दूषित विचारांचे असतील.

सर्व क्षत्रिय सुद्धा आपल्या धर्माचा त्याग करणारे, कुसंगी, पापी आणि व्यभिचारी असतील. त्यांच्यात शौर्याचा अभाव असेल, युद्धामध्ये प्रीति नसल्यामुळे पळपुटे असतील. ते कुत्सित चौर्य कर्माने उपजीविका चालवतील, शूद्रांप्रमाणे व्यवहार करतील आणि त्यांचे चित्त कामवासनेचा दास बनून राहील. ते शस्त्रास्त्रविद्या न जाणणारे, गाई आणि ब्राह्मणांचे रक्षण न करणारे, शरणागतांची रक्षा न करणारे आणि सदैव स्त्रियांच्या शोधात तत्पर असतील. प्रजापालनरूपी सदाचाररहित, भोगांमध्ये तत्पर (रमणारे), प्रजेचा संहार करणारे, दुष्ट आणि आनंदाने जीवहिंसा करणारे असतील.

वैश्य संस्कार भ्रष्ट, स्वधर्मत्यागी, कुमार्गी, धन मिळवण्यावरच लक्ष केंद्रित करणारे आणि माप-तोलामध्ये आपली कुत्सित वृत्ति दाखवणारे म्हणजे कपट करणारे असतील. ते गुरु, देवता आणि ब्राह्मणांप्रति भक्तिशून्य, कुत्सित बुद्धीचे, ब्राह्मणांना भोजन न देणारे, कृपण स्वभावामुळे नेहमी मुठ आवळून ठेवणारे (दान न करणारे), परस्त्रियांमध्ये आसक्त, मलिन विचारवाले, लोभ आणि मोहाने भ्रमित चित्ताचे आणि विहिरी, तलाव, सरोवरे इत्यादींचे निर्माण तसेच यज्ञादी सत्कर्मांमध्येही ते धर्माचा त्याग करणारे असतील.

तसेच काही शूद्र ब्राह्मणांच्या आचरणामध्ये तत्पर असतील, त्यांचा वेश उज्ज्वल असेल, म्हणजेच ते आपला कर्मधर्म सोडून आकर्षक वेशभूषा करून व्यर्थ फिरत राहतील, ते मूर्ख असतील आणि स्वभावतःच आपल्या धर्माचा त्याग करणारे असतील. ते विविध प्रकारची तपश्चर्या करणारे असतील, द्विजांचा अपमान करतील, लहान मुलांचे अकाली मृत्यू व्हावेत यासाठी आभिचारिक कर्म करतील,
मंत्रोच्चार करण्यात तत्पर राहतील, शालग्राम मूर्ती इत्यादींची पूजा करतील,
होम करतील, नेहमी कोणाच्या ना कोणाच्या विरोधात विचार करत राहतील,
कुटिल स्वभावाचे आणि द्विजांविषयी द्वेषभाव बाळगणारे असतील. जर ते श्रीमंत झाले तर कुकर्मामध्ये लागतील, जर विद्वान झाले तर वादविवाद करणारे होतील, कथा आणि उपासना धर्माचे वक्ता होतील आणि धर्माचा लोप करणारे होतील. ते सुंदर राजांसारखी वेशभूषा धारण करणारे, दांभिक, दान केल्याचा अभिमान असणारे, अति अभिमानी, ब्राह्मण इत्यादींना आपले सेवक समजून स्वतःला स्वामी मानणारे होतील, ते आपल्या धर्मापासून दूर गेलेले, मूर्ख, वर्णसंकर, क्रूरबुद्धीचे, महाभिमानी आणि सदैव चारही वर्णांच्या धर्माचा लोप करणारे होतील. ते स्वतःला श्रेष्ठ कुळाचे मानून चारही वर्णांच्या विपरीत व्यवहार करणारे, सर्व वर्ण भ्रष्ट करणारे, मूर्ख आणि अयोग्य रीतीने सत्कर्म करण्यात तत्पर होतील.

कलियुगातील स्त्रिया साधारणतः सदाचारापासून भ्रष्ट, पतीचा अपमान करणाऱ्या, सासू-सासऱ्यांचा द्रोह करणाऱ्या, कुणालाही न घाबरणाऱ्या आणि अपवित्र भोजन करणाऱ्या असतील. त्या कुत्सित हावभाव करण्यात तत्पर असतील, त्यांचे शील आणि स्वभाव अत्यंत वाईट असेल. त्या कामविकारांनी व्याकुळ असतील, परपुरुषांवर आसक्त असतील आणि आपल्या पतीची सेवा करण्यापासून नेहमीच दूर राहतील.

संतती माता-पित्यांविषयी श्रद्धारहित, दुष्ट स्वभावाची, असत् विद्या शिकणारी आणि त्यांचे शरीर नेहमी रोगांनी ग्रस्त असलेली असेल.

हे सूतजी ! अश्याप्रकारे ज्यांची बुद्धी नष्ट झाली आहे आणि ज्यांनी आपल्या धर्माचा त्याग केला आहे, अश्या लोकांना इहलोकी आणि परलोकी उत्तम गती कशी प्राप्त होईल ? याच चिंतेने आमचे मन सदैव व्याकूळ असते, परोपकारा सारखा दुसरा कोणता धर्म नाही. म्हणून ज्या छोट्या उपायाने या सर्व पापांचा तत्काळ नाश होईल, तो उपाय यावेळी कृपा करून आपण सांगावा, कारण आपण संपूर्ण सिद्धांतांचे ज्ञाता आहात.

व्यासजी म्हणाले, त्या भावितात्मा मुनींचे वचन ऐकून सूतजी मनातल्या मनात भगवान् शंकराचे स्मरण करून मुनींना अश्याप्रकारे सांगू लागले.

अश्याप्रकारे श्रीशिवमहापुराणान्तर्गत प्रथम विद्येश्वरसंहितामध्ये मुनींच्या प्रश्नांचे वर्णन नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top