श्रीशिवमहापुराण – माहात्म्य अध्याय ३

अध्याय ३

चंचुलाला पापापासून भय आणि संसारातून वैराग्य

मुनिश्रेष्ठ शौनक म्हणाले, हे महाभाग सूत ! तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमच्या कृपाप्रसादाने मी वारंवार कृतार्थ झालो. हा इतिहास ऐकून माझे मन अत्यंत आनंदित होत आहे. म्हणून आता भगवान शंकरांबद्दल प्रेम वाढवणारी शिवसंबंधित दुसरी कथा सांगा. अमृतप्राशन करणाऱ्यांना कोणत्याही लोकात मुक्ति प्राप्त होत नाही परंतु भगवान् शंकरांचे कथामृत पान साक्षात् मुक्ति देणारे आहे. सदाशिवांची जी कथा केवळ ऐकल्याने मनुष्य शिवलोक प्राप्त करून घेतो ती कथा धन्य आहे आणि कथा सांगणारे आपणही धन्य आहात.

सूत म्हणाले, हे शौनक ! ऐका ! मी तुमच्या समोर गोपनीय कथावस्तुचे सुद्धा वर्णन करणार आहे कारण तुम्ही शिवभक्तांमध्ये अग्रगण्य आणि वेदवेत्तांमध्ये श्रेष्ठ आहात.

समुद्राजवळच्या प्रदेशामध्ये एक बाष्कल नावाचे गाव आहे, जिथे वैदिक धर्मापासून विमुख महापापी असे द्विज (ब्राह्मण) राहतात. ते सगळे अतिशय दुष्ट आहेत, त्यांचे मन दूषित विषयोपभोगांमध्येच लागलेले असते. ते ना देवतांवर विश्वास ठेवतात, ना भाग्यावर. ते सगळे कपटी वृत्तीचे आहेत. ते शेती करता आणि अस्त्र-शस्त्र जवळ बाळगतात. ते परस्त्रीगामी आणि दुष्ट आहेत. ज्ञान, वैराग्य आणि सद्धर्म तर त्यांना अजिबात माहीत नाही. ते सर्व पशुबुद्धीचे आणि सदैव दूषित गोष्टी ऐकण्यात गुंतलेले असतात. अन्य वर्णांचे लोक सुद्धा त्यांच्याचप्रमाणे कुत्सित विचारांचे, स्वधर्मविमुख आणि दुष्ट आहेत. ते नेहमी कुकर्मामध्ये आणि नित्य विषयभोगांमध्ये डुबलेले असतात. तेथील सर्व स्त्रियासुद्धा कपटी स्वभावाच्या, स्वेच्छाचारिणी, पापासक्त, कुत्सित विचारांच्या आणि व्यभिचारिणी आहेत. त्या सद्व्यवहार व सदाचार रहित आहेत.

दुर्जनांचे निवासस्थान असलेल्या त्या बाष्कल नामक गावात एकेकाळी एक बिन्दुग नावाचा ब्राह्मण राहत होता, तो अत्यंत अधम होता. तो दुरात्मा व महापापी होता. जरी त्याची पत्नी सुंदर होती तरी तो कुमार्गावरच चालत होता. कामवासनेने कलुषित चित्ताचा तो वेश्यागामी होता. त्याच्या पत्नीचे नाव चंचुला होते, ती सदैव उत्तम धर्माचे पालन करणारी होती तरी सुद्धा तिला सोडून तो दुष्ट ब्राह्मण कामासक्त होऊन वेश्यागामी झाला होता. अश्याप्रकारे कुकर्मामध्ये रत असलेल्या त्या बिन्दुगाची अनेक वर्षे व्यतीत झाली. त्याची पत्नी चंचुला कामपीडित असून सुद्धा स्वधर्मनाशाच्या भीतीमुळे क्लेश सहन करत दीर्घकाळ धर्म भ्रष्ट झाली नाही. परंतु दुराचारी पतिच्या आचरणाचा प्रभाव होऊन कामपीडित झाल्यामुळे पुढे ती सुद्धा स्त्री दुराचारिणी झाली. भ्रष्ट चरित्राची ती कुमार्गगामिनी आपल्या पतीच्या नजरेतून लपून रात्री चुपचाप अन्य पापी पुरुषासोबत रममाण होऊ लागली. एकदा त्या ब्राह्मणाने आपल्या दुराचारिणी पत्नी चंचुला ला कामसक्त होऊन परपुरुषासोबत रात्री बघितले आणि तो क्रोधित होऊन धावत गेला. त्या दुष्ट बिन्दुकाला घरी आलेले पाहून तो कपटी व्यभिचारी तिथून पळून गेला. तो दुष्टात्मा बिन्दुक आपल्या बायकोला पकडून तिला जोरजोरात रागवत मारू लागला. ती व्यभिचारिणी दुष्टा चंचुला मार खाल्ल्यामुळे क्रोधित होऊन निर्भयतेने आपल्या दुष्ट पतीला बिन्दुगला म्हणू लागली.

चंचुला म्हणाली, मी पतिपरायण पत्नी असूनही आपण कुबुद्धीवश होऊन दररोज वेश्येसोबत इच्छेनुसार रमण करता. तुम्हीच सांगा की रूपवती व कामासक्त चित्ताच्या माझ्यासारख्या तरुणीची पति शिवाय काय गति होईल ? मी अत्यंत सुंदर आहे आणि नवयौवन उन्मत्त आहे. आपल्याशिवाय व्यथितचित्तवाली मी कामजन्य दुःख कसे सहन करू ?

त्या स्त्रीने अश्याप्रकारे म्हटल्यावर तो मूढबुद्धी, मूर्ख, ब्राह्मणाधम, स्वधर्मविमुख, दुष्ट, पापी बिन्दुग म्हणाला, कामविकाराने व्याकूळ होऊन तू सत्यच बोलली आहेस. हे प्रिये ! तू भय सोडून दे आणि मी जे सांगतो ते ऐक. तू निर्भय होऊन नित्य परपुरुषासोबत संबंध ठेव, त्यांना संतुष्ट करून त्यांच्याकडून धन घे. ते संपूर्ण धन वेश्येप्रति आसक्त असणाऱ्या मला देत जा. यामुळे तुझा आणि माझा दोघांचाही स्वार्थ सिद्ध होईल.

पतीचे हे बोलणे ऐकून त्याची पत्नी चंचुला आनंदित होऊन तिने त्याचे म्हणणे मान्य केले. त्या दोन्ही दुराचारी पति-पत्नीने अश्याप्रकारे एकत्र येऊन आणि ते दोघे निर्भय होऊन कुकर्मामध्ये लीन झाले. यातऱ्हेने दुराचारात डुबलेल्या त्या मूढ पति-पत्नीचा पुष्कळ काळ व्यर्थ लोटला. त्यानंतर शूद्रजातीय वेश्येचा पती झालेला तो दूषित बुद्धिवाला दुष्ट ब्राह्मण बिन्दुग, त्याचा काळानुसार मृत्यु झाला आणि तो नरकात गेला. अनेक दिवस नरकयातना भोगून तो मूढबुद्धि पापी विन्ध्यपर्वतावर भयंकर पिशाच झाला. इकडे, त्या दुराचारी पति बिन्दुकच्या मृत्यु नंतर ती मूढहृदया चंचुला पुष्कळ काळापर्यंत मुलांसोबत आपल्याच घरात राहिली. अश्याप्रकारे कामासक्त होऊन परपुरुषांसोबत विहार करणाऱ्या त्या चंचुला नावाच्या स्त्रीचे तारुण्य हळूहळू कमी होऊ लागले.

एकदिवस दैवयोगाने कोण्याएका पुण्यपर्वावर ती स्त्री आपल्या बन्धु-बान्धवांबरोबर गोकर्णक्षेत्री गेली. तीर्थयात्रींच्या संगतीमुळे तिने सुद्धा त्या काळी कोण्या तीर्थजलात स्नान केले. नंतर ती साधारणपणे बांधवांसोबत इकडे-तिकडे फिरू लागली. फिरता फिरता कोण्याएका देवमन्दिरात तिने एका दैवज्ञ ब्राह्मणाकडून भगवान् शंकरांची पवित्र व मंगलकारिणी उत्तम पौराणिक कथा ऐकली. कथावाचक ब्राह्मण सांगत होते, “जी स्त्री परपुरुषांसोबत व्यभिचार करते ती मृत्युनंतर जेव्हा यमलोकी जाते तेव्हा यमदूत तिच्या योनिमध्ये तापलेली लोखंडी सळाख टाकतात. पौराणिक ब्राह्मणाच्या तोंडून वैराग्य वाढवणारी कथा ऐकून चंचुला भयभीत होऊन थरथरू लागली. जेव्हा कथा समाप्त झाली आणि लोकं तिथून बाहेर गेले तेव्हा ती भयभीत स्त्री एकान्तात शिवपुराण कथा वाचणाऱ्या त्या ब्राह्मणाला म्हणू लागली.

ब्रह्मन् ! मला आपला धर्म माहित नव्हता म्हणून माझ्याकडून खूप मोठा दुराचार झाला आहे. तो ऐकून माझ्यावर अनुपम कृपा करून माझा उद्धार करा. मी मूढबुद्धीने घोर पाप केले आहे. मी कामान्ध होऊन आपले संपूर्ण तारुण्य व्यभिचारामध्ये घालवले. आज वैराग्यरसाने ओतप्रोत आपले हे प्रवचन ऐकून मला मोठी भीती वाटतेय. मी कंपित झाली आहे आणि मला या संसारापासून वैराग्य आले आहे. माझ्यासारख्या मूढ चित्ताच्या पापीनीचा धिक्कार आहे. मी सर्वदा निन्देच्या लायक आहे. मी कुत्सित विषयांमध्ये अडकलेली आणि आपल्या धर्मापासून विमुख झाली आहे. थोड्या सुखाकरता आपल्या हिताचा नाश करणारे आणि भयंकर कष्ट देणारे घोर पाप मी नकळतच केले आहे. माहित नाही कोण-कोणत्या घोर कष्टदायक दुर्गतिमध्ये मी पडणार आणि कोण बुद्धिमान पुरुष कुमार्गात मन लावणाऱ्या माझ्यासारख्या पापीनीला साथ देणार ? मृत्युकाळी मी त्या भयंकर यमदूतांना कसे बघेन? जेव्हा ते जबरदस्ती माझ्या गळ्यात फास टाकून मला बांधतील, तेव्हा मी कसे धैर्य धारण करू ? नरकात जेव्हा माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातील तेव्हा विशेष दुःख देणारी महायातना मी कशी सहन करेन ? दुःख आणि शोकग्रस्त होऊन दिवसा इन्द्रिय व्यापार आणि रात्री झोप कशी मिळेल? मी मेली!, मी जळाली ! माझे हृद्य विदीर्ण झाले आणि मी सर्व प्रकारे नष्ट झाली, कारण मी सर्वप्रकारे पापांमध्येच बडून राहिली. हे विधाता ! माझ्यासारख्या पापीनीला तुम्ही अशी दुर्बुद्धी का दिली, जी सर्वप्रकारचे सुख देणाऱ्या स्वधर्मापासून दूर करते. हे द्विज ! शूलाने बिंधलेला व्यक्ति उंच पर्वतावरून पडल्यानंतर जसे भयंकर कष्ट सहन करतो, त्याहीपेक्षा करोडो पट कष्ट मला आहे. शेकडों अश्वमेधयज्ञ करून किंवा शेकडों वर्षे गंगास्नान करून देखील माझ्या घोर पापांची शुद्धी संभव दिसत नाही. मी काय करू? कुठे जाऊ? कुणाचा आश्रय घेऊ? माझ्यासारख्या नरकगामिनीची या संसारात कोण रक्षा करणार ?

हे ब्रह्मन् ! आपणच माझे गुरु आहात, तुम्हीच माता आणि पिता आहात. मी तुम्हाला शरण आली आहे. माझ्यासारख्या दीन अबलेचा उद्धार करा, उद्धार करा.

सूतजी म्हणाले, हे शौनक ! अश्याप्रकारे दुःख आणि वैराग्याने युक्त झालेली चंचुला त्या ब्राह्मणाच्या चरणी पडली. तेव्हा त्या बुद्धिमान ब्राह्मणाने कृपापूर्वक तिला उठवून अश्या प्रकारे म्हटले.

अश्या प्रकारे श्रीस्कन्दमहापुराणान्तर्गत शिवपुराणमाहात्म्यामध्ये चंचुलावैराग्यवर्णन नामक तिसरा अध्याय पूर्ण झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top