अध्याय पाचवा
चंचुलाच्या प्रयत्नाने पार्वतीजींच्या आज्ञेने तुम्बुरु ने विन्ध्यपर्वतावर शिवपुराणकथा ऐकवून बिन्दुकाचे पिशाचयोनीमधून उद्धार करणे आणि त्या दंपतीचे शिवधामामध्ये सुखी होणे
शौनकजी म्हणाले, हे महाभाग सूतजी! आपण धन्य आहात, आपली बुद्धी भगवान् शिवजींमध्ये तल्लीन आहे. तुम्ही कृपाकरून ही शिवभक्ति वाढवणारी अद्भुत कथा आम्हाला ऐकवली. हे महामते ! सद्गती प्राप्त केल्यानंतर तिथे गेल्यानंतर चंचुलाने काय केले आणि तिच्या पतीचे काय झाले, हा संपूर्ण वृत्तांत विस्तारपूर्वक आम्हाला सांगा.
सूतजी म्हणाले, हे शौनक ! एक दिवस, परमानंदात निमग्न झालेल्या चंचुलाने उमादेवी जवळ जाऊन नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून ती त्यांची स्तुति करू लागली.
चंचुला म्हणाली, हे गिरिराजनन्दिनी ! हे स्कन्दमाता ! मनुष्यांनी सदैव आपली सेवा केली आहे. सर्व सुख देणारी हे शम्भुप्रिये ! हे ब्रह्मस्वरूपिणि ! आपण विष्णु आणि ब्रह्मा आदि देवतांद्वारा सेव्य आहात. आपणच सगुणा आणि निर्गुणा आहात आणि आपणच सूक्ष्मा सच्चिदानन्दस्वरूपिणी आद्या प्रकृति आहात. आपणच सृष्टि, पालन आणि संहार करणारी आहात. तीनही गुणांचा आश्रयही आपणच आहात. ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर या तीनही देवतांचे आवास स्थान आणि त्यांची उत्तम प्रतिष्ठा करणारी पराशक्तिही आपणच आहात.
सूतजी म्हणाले, हे शौनक ! जिला सद्गती प्राप्त झाली होती, ती चंचुला अशा प्रकारे महेश्वरपत्नी उमाजीं ची स्तुति करून मान खाली घालून शांत झाली. तिच्या डोळ्यांत प्रेमाश्रु आले. तेव्हा करुणेने ओतप्रोत शंकरप्रिया भक्तवत्सला पार्वतीदेवी चंचुलेला सम्बोधित करून मोठ्या प्रेमाने म्हणाली, हे सखी चंचुले ! मी तुझ्या स्तुतीने अतिशय प्रसन्न झाली आहे. बोल, काय वर पाहिजे ? तुला, माझ्याकरता अदेय (न देण्यासारखे) असे काहीच नाही.
सूतजी म्हणाले, देवी पार्वतीने असे म्हटल्यावर चंचुला त्यांना प्रणाम करून दोन्ही हात जोडून नतमस्तक होऊन प्रेमपूर्वक विचारू लागली.
चंचुला म्हणाली, हे निष्पाप गिरिराजकुमारी ! माझे पती बिन्दुग यावेळी कुठे आहेत, त्यांची काय गती झाली आहे, हे मला माहित नाही. कल्याणमयी दीनवत्सले ! मी आपल्या पतिदेवांशी पुन्हा एकत्र होऊ शकेल, कृपा करून असा काही उपाय करा. हे महेश्वरी ! हे महादेवी ! माझे पती एका शूद्रजातीय वेश्याप्रति आसक्त होते आणि पापातच बुडून रहायचे. त्यांचा मृत्यु माझ्या आधी झाला होता. न जाणे ते कोणत्या गतीला प्राप्त झाले.
सूतजी म्हणाले, चंचुलाचे बोलणे ऐकून नीतिवत्सला हिमालयपुत्री देवी पार्वतीने अत्यंत प्रेमाने उत्तर दिले. गिरिजा म्हणाली, तुझा बिन्दुक नावाचा पती अत्यंत पापी होता. त्याचे अंतःकरण अतिशय दूषित होते. वेश्येचा उपभोग घेणारा तो महामूढ मृत्युनंतर नरकात गेला, अगणित वर्षे नरकामध्ये विविध प्रकारचे दुःख भोगल्यानंतर तो पापात्मा आपले उरलेले पाप भोगण्याकरता विन्ध्यपर्वतावर पिशाच झाला. यावेळी तो पिशाचावस्थेतच आहे आणि वेगवेगळ्याप्रकारचे क्लेश सहन करतोय. तो दुष्ट तिथेच वायू पीत राहतो आहे आणि सर्वप्रकारचे कष्ट सहन करतोय.
सूतजी म्हणाले, हे शौनक ! गौरीदेवीचे हे बोलणे ऐकून उत्तम व्रताचे पालन करणारी ती चंचुला त्यावेळी पतीच्या महान दुःखाने दुःखी झाली. मन स्थिर करून त्या ब्राह्मणपत्नीने व्यथित हृदयाने महेश्वरीला प्रणाम करून पुन्हा विचारले.
चंचुला म्हणाली, हे महेश्वरी ! हे महादेवी ! माझ्यावर कृपा करा आणि दूषित कर्म करणाऱ्या माझ्या दुष्ट पतीचा आता उद्धार करा. हे देवी ! कुत्सित बुद्धिवाल्या माझ्या त्या पापात्मा पतीला कोणत्या उपायाने उत्तम गती प्राप्त होऊ शकेल, हे शीघ्र सांगा. आपल्याला नमस्कार आहे.
सूत म्हणाले, तिचे हे बोलणे ऐकून भक्तवत्सला पार्वतीजी आपली सखी चंचुलेवर प्रसन्न होऊन म्हणाली.
पार्वती म्हणाली, तुझ्या पतीने जर शिवपुराणाची पुण्यमयी उत्तम कथा ऐकली तर तो सगळ्या दुर्गतीला पार करून उत्तम गतीचा भागी होऊ शकतो. अमृतासमान मधुर अक्षरांनी युक्त गौरीदेवीचे हे बोलणे आदरपूर्वक ऐकून चंचुलाने हात जोडून वारंवार नमस्कार केला आणि आपल्या पतीच्या सर्व पापांच्या शुद्धीकरणाकरता आणि उत्तम गती करता पार्वतीदेवीला प्रार्थना केली की माझ्या पतीला शिवपुराण ऐकण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे.
सूतजी म्हणाले, त्या ब्राह्मणपत्नीने वारंवार प्रार्थना केल्यावर शिवप्रिया गौरीदेवीला दया आली. त्या भक्तवत्सला महेश्वरी गिरिराजकुमारी ने भगवान शिवजींच्या उत्तम कीर्तीचे गायन करणाऱ्या गन्धर्वराज तुम्बुरुला बोलावून त्याला प्रसन्नतापूर्वक असे म्हटले. गिरिजा म्हणाली, माझ्या मनातली गोष्ट जाणूण माझ्या अभिष्ट कार्यांची सिद्ध करणारे आणि शिवजींमध्ये प्रीति असणारे हे तुम्बुरु ! तुझे कल्याण होवो. तू माझ्या या सखी सोबत लगेच विन्ध्यपर्वतावर जा. तिथे एक महाघोर आणि भयंकर पिशाच राहतो. त्याचा वृत्तांत तू सुरवातीपासून ऐक. मी प्रसन्नतापूर्वक सगळं सांगते. पूर्वजन्मी तो पिशाच बिन्दुक नामक ब्राह्मण होता. तो माझी सखी चंचुलचा पती होता. परंतु तो दुष्ट आणि वेश्यागामी झाला. स्नान-संध्या आदि नित्यकर्म सोडून तो अपवित्र राहू लागला. क्रोधामुळे तो मूढबुद्धि झाला. तो कर्तव्याकर्तव्याचा विवेक करू शकत नव्हता. अभक्ष्यभक्षण, सज्जनांप्रति द्वेष आणि दूषित वस्तुंचे दान घेणे हेच त्याचे स्वाभाविक कर्म झाले होते. तो अस्त्र-शस्त्र घेऊन हिंसा करत, डाव्या हाताने खात असे, दीनलोकांना सतावित असे आणि क्रूरतेने दुसऱ्यांच्या घराला आग लावत असे. तो चांडाळांवर प्रेम करत असे आणि दररोज वेश्येच्या संपर्कात रहात असे. तो अतिशय दुष्ट होता. त्या पापीने आपल्या पत्नीचा त्याग केला होता आणि तो दुष्टांच्या संगतीत रत होता. त्याने वेश्येच्या कुसंगतीने आपले पूर्ण पुण्य नष्ट केले आणि धनाच्या लोभाने आपल्या पत्नीला निर्भय करून व्यभिचारिणी बनवले. मृत्युपर्यंत तो दुराचारातच अडकून राहिला. मग वेळ आल्यावर त्याचा मृत्यु झाला. तो पाप्यांचे भोगस्थान असणाऱ्या घोर यमपुरीमध्ये गेला आणि तिथे पुष्कळ नरकांना भोगून तो दुष्टात्मा यावेळी विन्ध्यपर्वतावर पिशाच झाला आहे. तिथेच तो दुष्ट पिशाच आपल्या पापांचे फळ भोगतो आहे. तू त्याच्यासमोर प्रयत्नपूर्वक शिवपुराणाच्या दिव्य कथांचे प्रवचन कर, जी परम पुण्यमयी आणि सर्व पापांचा नाश करणारी आहे. उत्तम शिवपुराणाच्या श्रवणाने त्याचे हृदय लगेच सर्व पापांतून शुद्ध होईल आणि तो त्या प्रेतयोनीचा त्याग करेल. दुर्गतीतून मुक्त झाल्यावर त्या बिन्दुग नामक पिशाचाला माझ्या आज्ञेने विमानात बसवून तू भगवान् शिवजींच्या जवळ घेऊन ये.
सूत म्हणाले, महेश्वरी उमाने अश्याप्रकारे आदेश केल्यावर गन्धर्वराज तुम्बुरु मनातल्या मनात अतिशय आनंदित झाले आणि आपल्या भाग्याचे कौतुक केले. त्यानंतर त्या पिशाचाची सती-साध्वी पत्नी चंचुलेसोबत विमानात बसून नारदांचे प्रिय मित्र तुम्बुरु वेगाने विन्ध्याचल पर्वतावर गेले, जिथे तो पिशाच रहात होता. तिथे त्यांनी त्या पिशाचाला बघितले. त्याचे शरीर विशाल होते आणि त्याची हनुवटी फार मोठी होती. तो कधी हसायचा, कधी रडायचा आणि कधी उड्या मारायचा. त्याची आकृती अतिशय विकराळ होती. भगवान शिवजींच्या उत्तम कीर्तीचे गान करणाऱ्या महाबली तुम्बुरुने त्या अत्यंत भयंकर पिशाचाला बलपूर्वक पाशांनी बांधले. त्यानंतर तुम्बुरुने शिवपुराणकथा वाचण्याचा निश्चय करून महोत्सवयुक्त स्थान आणि मण्डप आदिंची रचना केली. इतक्यातच संपूर्ण लोकांत अतिशय वेगाने प्रचार झाला की देवी पार्वतीच्या आज्ञेने एका पिशाचाचा उद्धार करण्याच्या उद्देशाने शिवपुराणाची उत्तम कथा ऐकवायला तुम्बुरु विन्ध्यपर्वतावर गेले आहेत. तेव्हा ती कथा श्रवण करण्याच्या लोभाने अनेक देवता आणि ऋषीदेखील शीघ्रतेने तिथे पोहचले. आदरपूर्वक शिवपुराण ऐकण्याकरता आलेल्या लोकांचा त्या पर्वतावर अद्भुत आणि कल्याणकारी समाज एकत्रित आला.
तत्पश्चात तुम्बुरुने त्या पिशाचाला पाशांनी बांधून आसनावर बसविले आणि हातात वीणा घेऊन गौरीपतींच्या कथागायनाला आरम्भ केला. माहात्म्यासहित प्रथम संहितेपासून सातव्या संहितेपर्यंत शिवपुराणकथा त्यांनी स्पष्टपणे वर्णन केली. सात संहितावाले शिवपुराण आदरपूर्वक श्रवण करून सर्व श्रोतागण पूर्णतः कृतार्थ झाले. ते परम पुण्यमय शिवपुराण ऐकून त्या पिशाचाने आपले सर्व पाप धुवून त्या पैशाचिक शरीराचा त्याग केला. लवकरच त्याचे रूप दिव्य झाले. अंगकांती गौरवर्णाची झाली. शरीरावर श्वेतवस्त्र आणि सर्व प्रकारचे पुरुषोचित आभूषण त्याच्या सर्वांगाला उद्भासित करु लागले. तो त्रिनेत्रधारी चंद्रशेखररूप झाला. अश्याप्रकारे दिव्य देहधारी होऊन श्रीमान् बिन्दुग आपली पत्नी चंचुला सोबत पार्वतीपति भगवान् शिवजींच्या दिव्य चरित्राचे गुणगान करू लागला. त्याच्या पत्नीला अश्याप्रकरे दिव्य रूपाने सुशोभित बघून ते सगळे देवता आणि ऋषी विस्मित झाले, त्यांचे चित्त परमानंदाने परिपूर्ण झाले. भगवान् महेश्वरांचे ते अद्भुत चरित्र ऐकून ते सर्व श्रोता परम कृतार्थ होऊन प्रेमपूर्वक श्रीशिवाजींचे यशोगान करत आपापल्या स्थानी गेले.
दिव्यरूपधारी श्रीमान् बिन्दुगही सुंदर विमानात आपल्या प्रियतमा सोबत बसून सुखाने आकाशात स्थित होऊन परम शोभित होऊ लागला. त्यानंतर महेश्वरांच्या सुंदर आणि मनोहर गुणांचे गायन करत तो आपली प्रियतमा व तुम्बुरुसोबत लगेचच शिवधामला पोहचला. तिथे भगवान् महेश्वर आणि पार्वती देवीने प्रसन्नतापूर्वक बिन्दुगचा मोठा सत्कार केला आणि त्याला आपला गण बनवले. त्याची पत्नी चंचुला पार्वतीजींची सखी झाली. त्या घनीभूतज्योतिःस्वरूप परमानन्दमय सनातनधामामध्ये अविचल निवास करून ते दम्पती परम सुखी झाले.
हा उत्तम इतिहास मी तुम्हाला ऐकविला, जो पापांचा नाश करणारा, उमा-महेश्वरांना आनंद देणारा, अत्यंत पवित्र आणि त्यांच्यामध्ये भक्ति वाढवणारा आहे. जो हा भक्तिपूर्वक ऐकतो किंवा एकाग्रचित्त होऊन याचे पठन करतो, तो अनेक सांसारिक सुखांना भोगून शेवटी मुक्ति प्राप्त करतो.
अश्याप्रकारे श्रीस्कन्दमहापुराणान्तर्गत शिवपुराणमाहात्म्यामध्ये बिन्दुगसद्गतिवर्णन नामक पाचवा अध्याय पूर्ण झाला.
