अध्याय सातवा
श्रोत्यांनी पाळायच्या नियमांचे वर्णन
श्रीशौनकजी म्हणाले, हे शिवभक्तांमध्ये श्रेष्ठ महाबुद्धीमान् सूतजी ! तुम्ही धन्य आहात, जे की तुम्ही ही अद्भुत आणि कल्याणकारिणी कथा आम्हाला ऐकविली. हे मुने ! शिवपुराणाची कथा ऐकण्याचे व्रत धारण केलेल्या लोकांनी कोणकोणत्या नियमांचे पालन करायला पाहिजे, हे कृपापूर्वक सगळ्यांच्या कल्याणाकरता सांगा.
सूतजी म्हणाले, हे शौनका ! आता शिवपुराण ऐकण्याचे व्रत घेतलेल्या पुरुषांकरता जे नियम आहेत, ते भक्तिपूर्वक ऐका. नियमपूर्वक ही श्रेष्ठ कथा ऐकल्याने कोणत्याही विघ्न-बाधेशिवाय उत्तम फलप्राप्ती होते. दीक्षा न घेतलेल्या लोकांना कथा ऐकण्याचा अधिकार नाही. म्हणून मुने ! कथा ऐकण्याची इच्छा असणाऱ्या सर्व लोकांनी प्रथम वक्त्याकडून दीक्षा घेतली पाहिजे. कथाव्रती ने ब्रह्मचर्य पाळावे, जमिनीवर झोपावे, पत्रावळींवर भोजन करावे, दररोज कथा समाप्त झाल्यावरच अन्न ग्रहण करावे. ज्याला शक्य असेल त्याने पुराणाच्या समाप्तीपर्यंत उपवास करून शुद्धतापूर्वक भक्तिभावाने उत्तम शिवपुराण ऐकावे. घृत (तूप) किंवा दुध पिऊन सुखाने कथाश्रवण करावी किंवा फळाहार करून किंवा एकच वेळा भोजन करून कथा ऐकावी. या कथेचे व्रत घेतलेल्या पुरुषाने दररोज एकदाच हविष्यान्न ग्रहण करावे. ज्याप्रकारे कथाश्रवणाच्या नियमांचे सुखपूर्वक पालन होईल, तसेच केले पाहिजे. कथाश्रवणमध्ये विघ्न उत्पन्न करणाऱ्या उपवासापेक्षा कथाश्रवणात शक्ति प्रदान करणारे भोजनच अधिक योग्य असे मी समजतो. जड अन्न, डाळी, जळलेले अन्न, सेम (शेंगा), मसूर, भावदूषित (अशुद्ध भावनेने बनवलेले) तसेच शिळे अन्न खाऊन कथाव्रती पुरुषाने कधीही कथा ऐकू नये. कथाव्रतीने वांगे, टरबूज, चिचिंडा, मुळा, कोहळा, कांदा, नारळाचे मूळ तसेच इतर कंदमुळे यांचा त्याग करावा. ज्याने कथेचे व्रत घेतले आहे त्या पुरुषाने कांदा, लसून, हींग, गाजर, मादक पदार्थ आणि आमिष म्हटल्या जाणाऱ्या वस्तुंचा त्याग करावा. कथेचे व्रत घेणाऱ्या पुरुषाने काम, क्रोध इत्यादी सहा विकारांचा, ब्राह्मणांच्या निंदेचा, पतिव्रता आणि साधु-संतांच्या निंदेचा त्याग केला पाहिजे. कथाश्रवणाचे व्रत धारण केलेल्या व्यक्तिने रजस्वला स्त्रीला बघू नये, पतित मनुष्याला कथेची गोष्ट सांगू नये, ब्राह्मणांचा द्वेष करणाऱ्या आणि वेदबहिष्कृत मनुष्यांसोबत संभाषण करू नाही. कथाव्रती पुरुषाने सत्य, शौच, दया, मौन, सरलता, विनय आणि मनाची उदारता या सद्गुणांना सदैव अंगीकारावे. श्रोता निष्काम असो किंवा सकाम त्याने नियमपूर्वक कथा ऐकावी. सकाम पुरुष आपली अभीष्ट कामना प्राप्त करतो आणि निष्काम पुरुष मोक्ष मिळवितो. दरिद्र, क्षय झालेला रोगी, पापी, भाग्यहीन आणि संतानरहित पुरुषाने देखील ही उत्तम कथा ऐकावी. काकवन्ध्या आदी ज्या सात प्रकारच्या दुष्ट स्त्रिया आहेत आणि ज्या स्त्रीचा गर्भ पडतो या सगळ्यांनी शिवपुराणाची उत्तम कथा ऐकायला पाहिजे. हे मुने ! स्त्री असो वा पुरुष सर्वांनी प्रयत्नपूर्वक विधि विधानांनी शिवपुराणाची उत्तम कथा ऐकली पाहिजे. या शिवपुराणाच्या कथापारायणांच्या दिवसांना अत्यंत उत्तम आणि करोडो यज्ञांसमान पवित्र मानले पाहिजे. या श्रेष्ठ दिवसांमध्ये विधिपूर्वक जी थोडी सुद्धा वस्तु दान केली जाते, तिचे अक्षय फळ मिळते. अश्याप्रकारे व्रतधारण करून या परम श्रेष्ठ कथा श्रवण करून आनंदपूर्वक श्रीमान् पुरुषांनी याचे उद्यापन करावे. याच्या उद्यापनाची विधी शिवचतुर्दशीच्या उद्यापनाप्रमाणे आहे. म्हणून इथे सांगितलेल्या फळाची इच्छा करणाऱ्या धनाढ्य लोकांनी त्याचप्रमाणे उद्यापन केले पाहिजे. अल्प धन असणाऱ्या भक्तांना उद्यापनाची आवश्यकता नाही. ते फक्त कथाश्रवणाने पवित्र होतात. भगवान् शिवजींचे निष्काम भक्त ते शिवस्वरूपच असतात. हे महर्षे ! अश्याप्रकारे शिवपुराणकथेच्या पठण आणि श्रवण संबंधित यज्ञोत्सव समाप्ती नंतर श्रोत्यांने भक्ती आणि प्रयत्नपूर्वक भगवान् शंकरांच्या पूजेसमान पुराण ग्रंथाची सुद्धा पूजा करावी. त्यानंतर विधीपूर्वक वक्त्याचेही पूजन करावे. ग्रंथ झाकण्यासाठी नवीन आणि सुंदर ग्रंथपेटी किंवा वस्त्रावरण बनवावे आणि त्याला बांधण्याकरता मजबूत व पवित्र असे सूत्र लावावे. नंतर त्याची विधिवत् पूजा करावी. पुराणाकरता जे लोकं नवीन वस्त्र आणि सूत्र देतात, ते जन्म-जन्मांतरात भोग आणि ज्ञानाने संपन्न होतात. कथावाचकाला अनेक प्रकारचे बहुमूल्य पदार्थ द्यायला पाहिजे आणि उत्तम वस्त्र, आभूषण आणि सुंदर पात्र इत्यादी विशेष रूपाने द्यायला पाहिजे. पुराणासाठी आसनरूपात जे लोकं कम्बळ, मृगचर्म, वस्त्र, चौकी, तख्ता इत्यादी प्रदान करतात, ते स्वर्ग प्राप्त करून यथेच्छ सुखांचा उपभोग घेऊन पुनः कल्पापर्यंत ब्रह्मलोकात राहून अन्ती शिवलोक प्राप्त करतात. मुनिश्रेष्ठ ! अश्याप्रकारे महान उत्सवासोबत ग्रंथ आणि वक्त्याची विधीवत् पूजा करून वक्त्याच्या साहाय्याकरता नेमलेल्या पण्डितांचा सुद्धा त्यापेक्षा काही कमी धन इत्यादी देऊन सत्कार करावा. तिथे आलेल्या ब्राह्मणांना अन्न-धन इत्यादींचे दान करावे. सोबतच गायन, वादन, नृत्य इत्यादींनी मोठा उत्सव साजरा करावा. जर श्रोता विरक्त असेल तर त्याच्याकरता कथा समाप्तीच्या दिवशी विशेषरूपाने त्या गीतेचा पाठ करावा जी श्रीरामचंद्रांप्रति भगवान् शिवजींनी गायली होती. जर श्रोता गृहस्थ असेल तर त्या बुद्धिमानने त्या श्रवण कर्माच्या शांती करता शुद्ध हविष्यद्वारा होम करायला पाहिजे. हे मुने ! रुद्रसंहितेच्या प्रत्येक श्लोकाद्वारे होम करावा किंवा गायत्री-मंत्रानी होम करावा कारण वास्तविकपणे हे पुराण गायत्रीमयच आहे किंवा शिवपंचाक्षर मूलमंत्रानी हवन करणे उचित आहे. होम करणे शक्य नसेल तर त्या विद्वानाने यथाशक्ती हवनीय हविष्याचे ब्राह्मणाला दान करावे. न्यूनातिरिक्ततारूप दोषांच्या शांती करता भक्तिपूर्वक शिवसहस्रनामाचा पाठ किंवा श्रवण करावे. यामुळे सगळं सफळ होते, यात संशय नाही, कारण तीनही लोकांत त्याशिवाय मोठी कोणतीही वस्तु नाही. कथाश्रवणसंबंधित व्रताच्या पूर्णतेच्या सिद्धीकरता अकरा ब्राह्मणांना मधुमिश्रित खीरीचे भोजन करवावे आणि त्यांना दक्षिणा द्यावी. जर शक्य असेल तर बारा तोळ्यांचे सोन्याचे एक सुंदर सिंहासन बनवावे आणि त्यावर उत्तम अक्षरांमध्ये लिहिलेल्या किंवा लिहून घेतलेल्या शिवपुराण ग्रंथाची विधीपूर्वक स्थापना करावी. त्यानंतर पुरुष आवाहन इत्यादी विविध उपचारांनी त्याची पूजा करून दक्षिणा ठेवावी. नंतर जितेन्द्रिय आचार्यांचे वस्त्र, आभूषण आणि गंध इत्यादींनी पूजा करून उत्तम बुद्धीवाल्या श्रोत्याने भगवान शिवाजींना संतुष्ट करण्याकरता दक्षिणेसहित तो ग्रंथ त्यांना समर्पित करावा. हे शौनक ! या पुराणाच्या दानाच्या प्रभावामुळे भगवान् शंकरांचा अनुग्रह प्राप्त करून पुरुष भवबंधातून मुक्त होतो. अश्या प्रकारे विधी-विधानांचे पालन केल्यावर श्रीसंपन्न शिवपुराण संपूर्ण फळ देणारे आणि भोग व मोक्ष देणारे असते.
हे मुने ! मी तुम्हाला शिवपुराणाचे संपूर्ण माहात्म्य, जे अभीष्ट फळ देणारे आहे, ते सांगितले. आता अजून काय ऐकायची इच्छा आहे? श्रीसंपन्न शिवपुराण सर्व पुराणांमध्ये टिळकस्वरूप मानले आहे. हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय, रमणीय आणि भवरोगांचे निवारण करणारे आहे. जे सदैव भगवान विश्वनाथाचे ध्यान करतात, ज्यांची वाणी शिवजींच्या गुणांची स्तुती करते आणि ज्यांचे दोन्ही कान त्यांची कथा ऐकतात, या जीव-जगतात त्यांचेच जन्म घेणे सफळ होते, ते निश्चितच संसारसागराला पार करून जातात. भिन्न-भिन्न प्रकारचे सर्व गुण ज्यांच्या सच्चिदानंदमय स्वरूपाला कधीही स्पर्श करु शकत नाहीत, जे आपल्या महिमेमुळे जगाच्या बाहेर आणि आत वाणी व मनोवृत्तीरूपाने प्रकाशित होतात, त्या अनंत आनंदघनरूप परम शिवाला मी शरण जातो.
अश्याप्रकारे श्रीस्कन्दमहापुराणात सनत्कुमारसंहितान्तर्गत श्रीशिवपुराणाच्या श्रवणव्रतींकरता विधीनिषेध आणि ग्रंथ व वक्त्याच्या पूजनाचे वर्णन नामक सातवा अध्याय पूर्ण झाला.
